यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अचानक घडलेल्या या प्रसंगाने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावर जुना चोपडा नाक्याजवळ ही घटना घडली. महेश संतोष येवले (वय ३२, रा. शिवाजीनगर, यावल) हा तरुण शेतातून काम आटोपून दुचाकीवरून शहराकडे येत होता. दरम्यान, धावत्या दुचाकीवर असतानाच त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून तो रस्त्यावर कोसळला.

घटनेचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील काही मुस्लिम तरुणांनी तातडीने मदत करत जखमी अवस्थेतील महेश येवले याला उचलून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. डॉ. तुषार सोनवणे यांनी प्राथमिक तपासणीनंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
ही घटना रविवारी दुपारी घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत महेश येवले हा कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, रोशन येवले, बापू जासूद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या घटनेमुळे अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांबाबत नागरिकांमध्ये पुन्हा एकदा जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे. तरुण वयातही अशा घटना घडत असल्याने आरोग्य तपासणी व जीवनशैलीबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.



