भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. घराजवळच सिमेंटचा बाकडा कोसळल्याने भरत दुर्गासिंग जेटवे (वय ३२, रा. विठ्ठल मंदिराजवळ, कंडारी) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ८ जुलै रोजी घडली असून, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत जेठवे हा आपल्या कुटुंबीयांसह कंडारी गावात राहत होता. मंगळवारी, ८ जुलै रोजी सकाळी तो आपल्या घराजवळ असताना अचानक त्याच्या डोक्यावर सिमेंटचा एक बाकडा कोसळला. या घटनेत भरत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

भरतच्या अकाली निधनाने जेटवे कुटुंबावर आणि कंडारी गावावर शोककळा पसरली आहे. एका क्षणात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अब्दुल रज्जाक खान करत आहेत. अशा प्रकारच्या अपघाती घटना टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.



