जळगाव प्रतिनिधी । ट्रेडींगमध्ये गुंतवणूकीसह आकर्षक व्याजाचे आमिष दाखवत जळगावातील तरूणाची ४ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, स्वप्निल गोपाळ पाटील (वय-३१) रा. खान्देश मिल कॉलनी, रिंगरोड जळगाव हा तरूण खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतो. १३ मे २०२१ रोजी त्यांच्या मोबाईलवर सोनल नावाच्या महिलने फोन करून इंदौर येथील मेगा पावर कार्पोरेशन येथून बोलत असल्याचे सांगून फरेक्स ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याजदर देत असल्याचे सांगितले. स्वप्निल यांना गुंतवणुकीसाठी विविध ऑफर देण्यात आले. गुंतवणुकीबाबतचे कागदपत्रांची विचारणा केली केल्यावर सदरील महिलेने ग्राहकांनी गुंतवणूकीची कागदपत्रे मोबाईलवर पाठविले. त्यानुसार स्वप्निल पाटीलने दिलेल्या वेबसाईट ला भेट दिली. गुतवणूकीबाबत खात्री झाल्यावर पाटील यांनी १४ मे २०२१ ते २ जुन २०२१ दरम्यान टप्याटप्याने ७ लाख ९९ हजार रूपये मेगा पॉवर कार्पोरेशनच्या नावे रक्कम ऑनलाईन बँकेत पाठविले. त्यानंतर स्वप्निल पाटील यांना सांगितल्याप्रमाणे मे व जून २०२१ या पहिल्या महिन्याचे व्याज व परतापोटी ३ लाख रूपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. उर्वरित रक्कम ४ लाख ९९ रूपये मिळविण्यासाठी स्वप्निल यांनी दिलेल्या मोबाईल व वेबसाईडवर संपर्क केला असता त्यांना बंद असल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वप्निलने जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनिवारी २४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे करीत आहे.