
चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना चाळीसगाव-धुळे रोडवरील दसेगाव फाट्याजवळ बुधवारी २ एप्रिल दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून डंपरचालकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैष्णवी वैभव चौधरी (वय २०, रा. चाळीसगाव ) आणि तिची मैत्रीण चंचल नामदेव लांडगे (वय २०, रा. रहीपुरी, ता. चाळीसगाव) या दोघी जणी स्कूटीने (क्र. एमएच 52 ए 4391) चाळीसगावहून धुळ्याच्या दिशेने जात होत्या. दसेगाव फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना, पाठीमागून येणाऱ्या डंपरने (क्रमांक एमएच 41 बीके 9687) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका :
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित डंपर चालक अत्यंत वेगात होता. रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्याने चालविलेल्या डंपरने स्कूटीला पाठीमागून उडवले. या धडकेत चंचल लांडगे हिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला, तर वैष्णवी चौधरी हिच्या हाता-पायाला गंभीर इजा झाली आहे. अपघातानंतर डंपर चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, चालकाला अटक :
याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत डंपर चालक बाळू नामदेव माळी (रा. नागपूर, ता. नांदगाव, जि. नाशिक) याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास डी. आव्हाड करत आहेत.



