जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील कानळदा येथील १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली.आत्महत्येचे नेमके कारण समजून आलेले नाही.
गणेश उर्फ सागर समाधान सपकाळे (वय १९, रा.कानळदा) असे मयत तरुणाचे नाव आहे. गणेश हा गेल्या काही दिवसांपासून बांभोरी येथील कंपनीत कंत्राटी म्हणून कामाला होता. परंतू गणेश आज कामाला गेला नव्हता. गणेशचे वडील समाधान सपकाळे व आई ज्योतीबाई हे शेतात कामासाठी गेले होते. तर लहान भाऊ मयुर हा देखील बाहेर गेला होता. त्यामुळे गणेश हा घरी एकटाच होता. त्याने राहत्या घरात स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गणेशच्या मित्राचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला ही घटना दिसून आली. त्याने शेजारील नागरिकांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्याला तात्काळ खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याला तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुर वाघ यांनी मयत घोषित केले. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.