धरणगावकरांसाठी योगेश वाघ ठरले जलदूत !

wagh

 

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासाठी पाणीटंचाई हा प्रकार काही नवीन गोष्ट नाहीय. आजच्या घडीलाही गावात साधारण 20 ते 25 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतोय. अगदी घरी एक टॅकर मागवायचे म्हटले तर बाराशे ते तेराशे रुपये मोजावे लागताय. एक हंडा पाणीसाठी महिलांच्या जीवाचे हाल होत असतांना दुसरीकडे मात्र, शिवसेनेचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश वाघ यांनी चक्क आपली ट्यूबवेल सर्व सामान्य धरणगावकरांसाठी खुली करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दरम्यान, आजच्या घडीला श्री.वाघ हे धरणगावकरांसाठी अगदी जलदूत म्हणूनच समोर आले आहेत.

 

 

उन्हाचे चटके सुरू झाल्यानंतर पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर व्यापक बैठका घेणे अपेक्षित असते. या बैठकीत टंचाई असणाऱ्या भागात तातडीने उपाययोजनेचा आदेश दिल्यास प्रशासन गतिमान होते. मात्र आचारसंहितेमुळे अजूनही अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे धरणगावात पाणी टंचाई हा गंभीर विषय होत चालला आहे. अनेकांचा दिवस फक्त पाणी भरण्यातच वाया जातो. सध्या लग्न सराई असल्यामुळे नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पाहुण्यांचे येणे सुरु आहे. परंतु पाण्याअभावी त्यांचे मोठे हाल होताय. पालिकेत पाण्याच्या टॅकरसाठी दहा ते पंधरा दिवस आधी बुकिंग करावी लागतेय. तर दुसरीकडे खाजगी टॅकर चालक बाराशे ते तेराशे रुपये एका टॅकरला भाव आकारताय.

 

 

धरणगावात महिला तळपत्या कडक उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करीत दाही दिशा भटकंती करत आहेत. या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शिवसेनेचे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी आपली ट्यूबवेल सर्व सामान्य धरणगावकरांसाठी खुली करून दिली आहे. मोठा माळीवाडा परिसरातील राहत्या घराजवळील ही ट्यूबवेल त्यांनी काही दिवसांपासून खुली केली आहे. त्यामुळे धरणगावकरांना थोड्या प्रमाणात का असेना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नागरिकांनी दिवसभर अगदी रात्री केव्हाही पाणी भरण्यासाठी यावे, असे आवाहन योगेश वाघ यांनी केले आहे. श्री. वाघ यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे गावातून अभिनंदन केले जात असून धरणगावकरांसाठी अगदी जलदूत म्हणून समोर आले आहेत.

Add Comment

Protected Content