फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या दैनंदिन आहार -विहार, आचार- विचार यामुळे आज प्रत्येक माणसाला काही ना काही आजार आहे. आपल्याला आजार होऊच नये म्हणून रामबाण उपाय म्हणजे योगासन आहे असे महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज यांनी जागतिक योग दिनानिमित्त उपस्थित साधकांना सांगितले.
दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री निष्कलंक धाम वढोदे येथे २१ जून २०२४ रोजी सकाळी सहा ते आठ दरम्यान निसर्गरम्य वातावरणात भव्य अशा लॉनवर योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, श्री निष्कलंकधाम येथे तुलसी हेल्थकेअर सेंटरची निर्मिती यासाठीच करण्यात आली आहे. या ठिकाणी महिन्यातून दोन वेळा शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म शिबिर घेण्यात येते. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या माध्यमातून निष्कलंक व्हिजन सेंटर द्वारे मोफत डोळे तपासणी तसेच अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको ऑपरेशन करण्यात येत आहे. यापुढे गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेत जाऊन डोळे तपासणी शिबिर घेण्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती सुद्धा महाराजांनी दिली.
यावेळी योगाचार्य आचार्य सचिनजी यांनी योगाचे महत्व व प्रात्यक्षिक करून दाखविले. ते म्हणाले प्रत्येकाने दिवसातून कमीत कमी तीस मिनिट तरी योगासन करावे. त्यात महत्त्वाचे अनुलोम विलोम, कपालभाती, आणि भ्रामरी हे तीन प्राणायाम नित्यनियमाने करावे. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होऊन एकाग्रता वाढते. त्यांनी योगासन प्राणायाम ध्यानधारणा या संदर्भात प्रात्यक्षिकासह माहिती दिली. आपल्या आपल्या ऋषीमुनींनी दिलेली योगासनांची अमूल्य देणगीचा प्रचार व प्रसार करून आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला योगाभ्यासाचा प्रयोग २१ जून म्हणून जागतिक योगादिन जगभरात साजरा करण्यात येत आहे. ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. यावेळी जिल्हाभरातून जवळपास २०० विद्यार्थी, महिला, नागरीक, उपस्थित होते.