यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात आज तरूण महिलेच्या झालेल्या खून प्रकरणाला आधीच्या हल्ल्याची किनार असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील प्राथमिक माहितीनुसार, शहरातील परिसरात आज सायंकाळी उशीरा नजमा खलील काझी ( वय ३५, रा. काजीपुरा) या महिलेवर कुर्हाडीने हल्ला करण्यात आला. यात ही महिला गतप्राण झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात ही खबर वार्यासारखी पसरताच परिसर हादरला आहे. यावल येथील ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषीत केले आहे.
दरम्यान, नाजिया खलील काझी यांच्या हत्या प्रकरणामागे आधीच्या हल्ल्याची किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जावेद युनुस पटेल (वय २८, रा. यावल) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी जावेद पटेल याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यातून तो सुदैवाने बचावला होता. त्याला या हल्ल्यात बर्याच जखमा झाल्या होत्या. याच हल्ल्याच्या प्रकरणात मयत महिला आणि तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे चारही जण गेल्याच महिन्यात कारागृहातून सुटून आले होते. तेव्हापासून जावेद हा त्यांच्या मागावर असल्याची माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, आज त्याने थेट नजमावर हल्ला करून तिला संपविले.
त्याने आज दबा धरून नाजिया काझी यांच्यावर कुर्हाडीने दोन वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याने परिसर सुन्न झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.
काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील चितोडा येथील तरूणाचा खून झाला होता. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून ते पोलीस कोठडीत आहेत. या खून प्रकरणाला उधारीने घेतलेल्या पैशांच्या वादाची किनार होते. तर आज यावल येथे झालेल्या आधीच्या हल्ल्याची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज पुन्हा एकदा यावल तालुक्यात खुन झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.