Yawal यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात आज सायंकाळी महिलेचा खून केल्याचा उलगडा लागलीच झाला असून पूर्व वैमनस्यातून या स्त्रीला प्राण गमवावे लागले असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सायंकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास एका महिलेवर कुर्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी सदर मयत महिलेचा पती खलील जाकीर अहमद काझी (वय- ४३ धंदा- मजुरी रा. काझीपुरा यावल ) यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, तो काझीपुरा भागात पत्नी नामे नजमा बानो काझी वय-३६, तीन मुली व दोन मुले यांच्यासोबत राहत आहे. आपला मजुरीकाम करण्याचा व्यवसाय असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आपल्या घराजवळ जावेद युनुस पटेल हा राहत असुन तीन महीण्यापुर्वी त्याचे आणि माझी पत्नी नजीमा बानो काझी यांचेत भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन तो माझे पत्नीस हाताने इशारे करुन धमकावीत असे. याबाबत त्याला समज देण्याचा प्रयत्न करून देखील त्याच्या वर्तनात फरक पडला नव्हता. दरम्यान, आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी नजमा बानो काझी ही किराणा सामान घेण्यासाठी बाहेर गेली होती. यानंतर तिच्यावर हल्ला झाल्याची माहिती शेजारी रहीम खान यांनी दिली. जावेद युनुस पटेल याने डोक्यावर कुर्हाडीचे वार करुन जखमी केले आहे. व तिला पोलीसांनी तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे नेले असल्याची माहिती आपल्याला मिळाली.
यानुसार मी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली असता नजमा बानो ही मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. जावेद युनुस पटेल याने जुन्या वादाचे राग मनात धरुन सुतारवाडा कॉर्नरजवळ माझे पत्नी नजमा बानो काझी वय-३६ हिला डोक्यावर कुर्हाडीचे वार करुन तिचा खून केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.