यावल तालुक्यातील जि.प. शाळांना हक्काची इमारत नसल्याने झोपडीत सुरु शाळा

यावल प्रतिनिधी । एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार मोठं मोठाले दावे करतात. मात्र, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांचे भीषण वास्तव आज समोर आले आहे. तालुकांतर्गत येणाऱ्या ७ शाळांना अद्यापही हक्काची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना झोपडीत शिक्षण दिले जात आहे. अशी माहिती सीईओंनी घेतलेल्या आढावा बैठकीत समोर आली आहे.

तालुक्यातील सातपुडा पर्वतातील अतिदुर्गम आदिवासी क्षेत्रातील जिल्हा परिषदच्या शाळांना आज देखील आंबापाणी, टेंभुरणबारी, चारमळी, माथन, साक्यादेव, लंगडाआंबा, रूईखेडा या ठिकाणच्या ७ शाळांना आज देखील ईमारती नसल्याने येथील विद्यार्थी झोपड्यांमध्ये शिक्षण घेत असल्याची धक्कादायक माहीती समोर आली. त्याचप्रमाणे तालुक्यातील १११ मुलींच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये अद्याप २९ शाळांमध्ये अद्याप विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहच नसल्याची माहिती आढावा बैठकीत शिक्षण विभागाकडुन शिक्षणधिकारी नईम शेख यांनी दिली.

यामुळे आदीवासींच्या नांवाखाली शासनाच्या कडुन लाखो रुपयांच्या योजना या फक्त कागदावरच आहे काय असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. तसेच यावेळी गरोदर मातांच्या पोषण आहार व कुपोषीत बालकांच्या विषयाला गांर्भीयांने घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सिईओ पंकज आशिया यांनी म्हटले आहे. आज पंचायत समितीच्या अंतर्गत विविध शासकीय योजनांची अमंलबजावणी आणी प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी आज यावल येथे भेट देवुन संपुर्ण कामांचा आढावा घेतला.

दरम्यान आज दि.१३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता यावल पंचायत समितीच्या सभागृहात जळगाव जिल्हा परिषदचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या विभाग निहाय कामाचा आढावा सविस्तर आढावा घेतला.

दरम्यान या बैठकीत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभाग वगळता इतर सर्वच विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतांना गोंधळलेले उत्तर मिळत होते. यावेळी ज्या विभागाच्या कामांची शासनाव्दारा दिलेल्या कामांची प्रगती अत्यल्प असेल त्यांना तात्काळ नोटीसा बजवा अशा सुचना यावेळी पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. या आढावा बैठकीत महीला व बालविकास विभागाच्या व आरोग्य विभागा, मनरेगा  तसेच बांधकाम विभागाच्या वतीने गोंधळलेले अर्धवट उत्तरे मिळत असल्याने सिईओ पंकज आशिया यांनी अशा प्रकारच्या कार्यपद्धतीवर असामाधान व्यक्त केले.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस. पाटील, ग्रामविस्तार अधिकारी हबीब तडवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमन्त बऱ्हाटे, गटशिक्षण अधिकारी नईम शेख, महीला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रभारी महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोये, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी. पी .कोते यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीस उपस्थित होते.

 

Protected Content