Home आरोग्य यावल एसटी बस चालक-वाहकांचे माणुसकीचे दर्शन ; प्रवासी महिलेला मिळाले जिवदान

यावल एसटी बस चालक-वाहकांचे माणुसकीचे दर्शन ; प्रवासी महिलेला मिळाले जिवदान


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल आगाराच्या एसटी बसमधील एका महिला प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने निर्माण झालेल्या धावपळीच्या प्रसंगात चालक व वाहकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिचे प्राण वाचले. कर्तव्य बजावत असतानाच माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या या दोघा कर्मचाऱ्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

यावल आगाराची सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी यावल बसस्थानकावरून सुटणारी बस नियमितप्रमाणे मार्गस्थ झाली होती. यावल येथील जमिला मुस्तफा तडवी या महिला प्रवासी लोहारा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. बस फैजपूर येथून पुढे निघाल्यानंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना चक्कर येऊन प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच बसचे वाहक नबाब छबू तडवी यांनी तातडीने चालक रफिक नामदार तडवी यांना परिस्थितीची माहिती दिली.

क्षणाचाही विलंब न करता चालकाने बस जवळील दवाखान्याकडे वळवली. संबंधित महिला प्रवाशांना तत्काळ डॉ. सुनिल चौधरी यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. वेळेवर रुग्णालयात आणल्यामुळे महिलेची प्रकृती स्थिर झाली. उशीर झाला असता परिस्थिती अधिक गंभीर झाली असती, असे स्वतः संबंधित महिलेने नंतर सांगितले.

प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर जमिला तडवी यांनी स्वतः यावल आगारात जाऊन चालक रफिक नामदार तडवी व वाहक नबाब छबू तडवी यांचे आभार मानले. आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल, वाहतूक निरीक्षक सिद्धार्थ सोनवणे व निलेश महाजन, तसेच चालक दिलीप ठाकरे, हेमंत पाटील, लिपीक संदीप पाटील, अतुल चौधरी व अन्य चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

घटना घडली त्या वेळी जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, खिरोदा येथील मुख्याध्यापिका सौ. संगीता धनंजय पाटील या देखील त्या बसमध्ये प्रवास करत होत्या. त्यांनी चालक व वाहक यांच्या तत्परतेचे आणि मानवतेचे कौतुक करत अशा कर्मचाऱ्यांमुळे एसटीची प्रतिमा उंचावते, असे मत व्यक्त केले.

कर्तव्य पार पाडताना प्रवाशांच्या जीवितास प्राधान्य देत दाखविलेल्या धाडसामुळे चालक रफिक नामदार तडवी व वाहक नबाब छबू तडवी हे परिसरात कौतुकाचे धनी ठरले असून एसटी कर्मचाऱ्यांमधील संवेदनशीलतेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.


Protected Content

Play sound