यावल-अय्यूब पटेल | पावसामुळे रस्ते खराब झाल्याने शहरातल्या बर्याच भागांमधील लोक त्रस्त झाले असतांना नगरपालिकेच्या वेडपट कारभारामुळे त्यांच्या संतापात भर पडली आहे.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यावल शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. यातच स्थानिक प्रशासनाच्या कारभारामुळे लोक अजून संतापले आहेत. येथील नगर परिषदेवर मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधी पासुन उंटावर बसुन शेळया हाकण्याचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रातील शहरातील विस्तारित वस्तीमधील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन या परिसरातील रहीवासी नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असुन या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांमध्ये संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.
जवळपास पन्नास हजाराच्यावर लोकसंख्या असलेल्या यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या विस्तारीत क्षेत्रातील फालक नगर, गंगानगर, आयशानगर, पवननगर आदी ठिकाणी रस्ते नसल्याने पावसाळयामुळे सर्वत्र घाणीचे आणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळेा परिसरातील राहणार्या नागरीकांना व वाहनधारकांना मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान यावल शहरात नगर परिषदच्या प्रशासकीय राजवटीच्या गोंधळल्या कारभारामुळे जो तो पुढारी आपले राजकीय वजन वापरून आपआपल्या परीने सोयीनुसार मंजुर करून आणलेल्या शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन नको त्या ठिकाणी रस्ते चांगल्या अवस्थेत असतांना ही आपल्या राजकीय हेतु साध्य करण्यासाठी त्याच रस्त्यांवर निकृष्ट रस्ते तयार करत आहेत. या प्रश्नांकडे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष वेधुन या सर्व नियम धाब्यावर ठेवुन सुरू असलेल्या कामांची त्वरीत चौकशी करीत कारवाई करावी व ज्या ठिकाणी खर्या अर्थाने रस्त्यांची गरज आहे त्याच ठिकाणी रस्ते निर्माण करावीत अशी मागणी आता शहरातून होत आहे.