Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी; माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी

यावल नगरपालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी; माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची मागणी


यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील मिळकतधारकांना दिलासा देणाऱ्या मालमत्ता करावरील शास्ती व व्याज माफीच्या अभय योजनेला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे. त्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देत जिल्हास्तरावरून तातडीने तीन आठवड्यांची मुदतवाढ मिळवावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे.

नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या आदेशानुसार यावल नगरपालिका हद्दीतील मिळकतधारकांसाठी मालमत्ता करावरील शास्ती व व्याज माफीची अभय योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेचा कालावधी १५ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ असा फक्त पंधरा दिवसांचा निश्चित करण्यात आला होता. मात्र, या योजनेबाबत नगरपालिका प्रशासनाने उशिरा म्हणजे २० जुलै रोजी वृत्तपत्रांत जाहिरात दिली, त्यामुळे योजना पूर्ण जनतेपर्यंत पोहोचली नाही. परिणामी, अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.

योजनेच्या कालावधीत केवळ ५ लाख रुपये एवढीच वसुली करण्यात आली असून, शहरातील मिळकतधारकांकडे सुमारे ४ ते ४.५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही आकडेवारी पाहता, वसुली अत्यल्प झाल्याचे स्पष्ट होते. यामुळेच योजनेला मुदतवाढ दिल्यास नागरिकांना लाभ घेता येईल आणि पालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ होईल, असे मत माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मांडले.

पाटील यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगरपालिका प्रशासनाने थकबाकीदारांना पत्राद्वारे अभय योजनेबाबत माहिती द्यावी, जनजागृती मोहीम राबवावी व प्रत्येक मिळकतधारकाला योजना समजावून सांगून, वसुलीत वाढ करावी. मुदतवाढ मिळाल्यास, अधिकाधिक नागरिक या संधीचा लाभ घेऊन थकबाकी भरतील आणि पालिकेचे उत्पन्नही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound