Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपालिकेचा २२६ कोटींचा भव्य अर्थसंकल्प सादर 

यावल नगरपालिकेचा २२६ कोटींचा भव्य अर्थसंकल्प सादर 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याच्या उद्देशाने यावल नगरपालिके चा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल २२६ कोटी १० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांनी नगरपालिकेच्या सभापटलावर हा अर्थसंकल्प मांडला असून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता व गृहनिर्माण यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे.

सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार पुढील दोन वर्षांसाठी विविध शासकीय योजनांमधून अपेक्षित अनुदानाचा समावेश करण्यात आला आहे. सहाय्यक अनुदानासाठी ८ कोटी रुपये, विशेष रस्ता अनुदान ३ कोटी रुपये तर सर्वसाधारण रस्ता अनुदानासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १५व्या वित्त आयोगाच्या मुलभूत अनुदानातून २ कोटी रुपये अपेक्षित असून नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेसाठी २ कोटी ५ लाख रुपये प्रस्तावित आहेत.

घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांचे अनुदान, ग्रॅट-इज-एड (कोर्ट) अंतर्गत विशेष अनुदान ६ कोटी रुपये तसेच दलितेतर वस्ती विकासासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अंतर्गत १ कोटी ५ लाख रुपये तर महाराष्ट्र महानगरोत्थान अभियान (राज्यस्तर) अंतर्गत तब्बल १८३ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

याशिवाय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) अंतर्गत १० लाख रुपये, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी २ कोटी रुपये, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १ कोटी ५ लाख रुपये तसेच अग्निशमन बळकटीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे. विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदानासाठी ४ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

नगरसेवक अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत या अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती दिली. शहरातील मूलभूत सुविधा मजबूत करण्यासोबतच स्वच्छता, गृहनिर्माण आणि सामाजिक समावेशक विकासावर भर देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांना गती देण्यासाठी विविध शासकीय योजनांचा प्रभावीपणे वापर करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound