यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकृतपणे सुरू होत आहे. सोमवार, दि. १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नाझीरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत तहसीलदार नाझीरकर यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे उपस्थित होते. यावल नगरपालिका निवडणूक २०२५ साठी नगराध्यक्षपदासह ११ प्रभागांतील २३ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत राहणार असून, रविवार हा सुट्टीचा दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज सादर करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज सादरीकरणासाठी नगरपालिका भवनात आवश्यक प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचे तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले.
उमेदवार आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ती माहिती देणारा डिजिटल फलक पालिका आवारात लावण्यात आला आहे. उमेदवारांना लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी “एक खिडकी योजना” सुरू करण्यात आली आहे. तसेच सभा, लाऊडस्पीकर आणि जाहीर कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या परवान्यांची जबाबदारी पोलीस ठाण्याकडे देण्यात आली आहे.
नाझीरकर यांनी पुढे सांगितले की, उमेदवारी अर्ज सादर करताना शिस्त राखण्यासाठी विशिष्ट नियम ठरवले आहेत. उमेदवारांसोबत आलेल्या नागरिकांना नगरपालिका इमारतीपासून १०० मीटर अंतरावर थांबवण्यात येईल, तर अर्ज सादर करताना उमेदवारासोबत फक्त ४ ते ५ प्रतिनिधींनाच आत प्रवेश दिला जाईल.
निवडणूक कार्यक्रमात अर्ज भरणे, छाननी, माघारी, मतदान आणि मतमोजणीच्या सर्व टप्प्यांची माहिती प्रशासनाने स्पष्टपणे दिली आहे. एकूण ११ प्रभागांसाठी ३७ मतदान केंद्रे असतील, ज्यात २३ नगरसेवकांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे नाझीरकर यांनी सांगितले.
यावल शहरात निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी विविध पक्ष आणि स्वातंत्र्य उमेदवारांची धावपळ वाढली असून, येत्या काही दिवसांत शहरातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.



