Home प्रशासन नगरपालिका यावल नगरपालिकेत ‘लेक लाडकी’ योजनेला मंजुरी 

यावल नगरपालिकेत ‘लेक लाडकी’ योजनेला मंजुरी 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी यावल नगरपालिकेने ‘लेक लाडकी’ ही अभिनव योजना राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मुलीच्या जन्मानंतर संबंधित कुटुंबाला दोन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एकूण ८१ विषय पटलावर असताना त्यापैकी ८० विषयांना मंजुरी देण्यात आली.

यावल नगर परिषदेची सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाबद्दल सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकारी निशिकांत गवई आणि सहाय्यक मुख्याधिकारी रविकांत डांगे यांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात केली.

‘लेक लाडकी’ योजनेवर चर्चा करताना नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी शहरातील मागील वर्षातील मुलींचा जन्मदर केवळ ७३ टक्के असल्याची माहिती सभागृहाला दिली. मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, निधी उपलब्धतेबाबतही नियोजन करण्यात आले आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला दोन हजार रुपये अनुदान देण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब करत हा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

सभेत नगर परिषद मालकीच्या क्रीडांगणासाठी आरक्षित जागा विकसित करण्याच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. नगरसेवक अतुल पाटील यांनी सन २०१७ मध्ये या जागेसाठी एक कोटी ४२ लाख रुपये संबंधित मालकास देण्यात आल्याची माहिती दिली. क्रीडांगण विकसित करून युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रस्तावालाही सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. हे कॅमेरे बसवल्यानंतर त्यांचे नियंत्रण व देखभाल पोलीस प्रशासनाकडे सोपविण्यात येणार असून दुरुस्तीचा खर्चही पोलीस प्रशासनाकडून करण्यात यावा, अशी सूचना सभेत करण्यात आली.

या सभेत उपनगराध्यक्ष सईदाबी मोहम्मद याकूब, काँग्रेस गटनेत्या कमरुन्निसाबी सैफुद्दीन, भाजप गटनेत्या नंदा महाजन, शिवसेना उबाठा गटनेते सागर चौधरी, राष्ट्रवादी (अप) गटनेत्या वर्षा चोपडे तसेच नगरसेविका कल्पना वाणी, उमेश फेगडे, हेमराज हेगडे, पराग सराफ, योगेश चौधरी, रुबाब तडवी आदी सदस्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. एकूण ८१ पैकी ८० विषयांना मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गट क्रमांक ७१४ व १०३८ मधील खुल्या जागेत ‘नमो गार्डन’ विकसित करण्याचा प्रस्ताव सभेपुढे मांडण्यात आला. या विषयाला भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. गार्डन गट क्रमांक ८२८ किंवा इतर लोकवस्तीतील भूखंडावर व्हावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने गट बदलाचा प्रस्ताव नाकारण्यात आला. अखेरीस भाजपाच्या १२ सदस्यांनी विरोध नोंदवला असला तरी सत्ताधारी गटाच्या १३ सदस्यांच्या बहुमताने ‘नमो गार्डन’चा विषय मंजूर करण्यात आला.


Protected Content

Play sound