यावल अय्युब पटेल | येथील पालिकेच्या कोणतीही करवाढ नसलेल्या ३१ लाख८९ हजार५९६ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास बुधवारी विशेष सभेत मंजूरी देण्यात आली.
येथील पालिकेच्या कोणतीही करवाढ नसलेल्या २०२१-२२या आर्थिक वर्षाचे ३१ कोटी ८१ लाख३५ हजार ९७४ रूपये अपेक्षित उत्पन्न, व ३९ कोटी४९ लाख४६ हजार३७८ खर्च वजा जाता३१ लाख८९ हजार५९६ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास बुधवारी विशेष सभेत मंजूरी देण्यात आली.
विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी उपस्थित होत्या. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष रुख्माबाई भालेराव, मुख्याधिकारी बबन तडवी होते. घरपट्टीत करवाढ करून, पाणीपट्टीतील तूट भरून काढण्यासाठी करवाढ करण्यात यावी अशी शिफारस प्रशासनाच्या वतीने लेखापाल नितीन सुतार यांच्या कडुन अर्थसंकल्प वाचनातून करण्यात आली. पालिकेने करवाढ करण्यासाठी नगराध्यक्ष नौशाद तडवी देखील अनुकूल होत्या, मात्र माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शहर विकास आघाडी प्रमुख अतुल पाटील यांनी पुढील वर्षी रिव्हिजन असल्यामुळे करवाढ होणार असल्याने या वर्षी कोरोनाकाळात अनेकांचा रोजगार बुडून अनेकांच्या हातास काम नाही. अशा परिस्थितीत पालिकेने कोणतीही करवाढ करू नये अशी मागणी केली. उपस्थित सर्वच नगरसेवकांनी त्यास दुजोरा देत करवाढ करु नये असे सभागृहात सांगितले.याशिवाय पालिकेचे उत्पन्न वाढीसाठी डेली मार्केट, आठवडे बाजार, मच्छीमार्केटचे लिलाव त्वरीत करावे.पालिकेच्या मालकीचे एपीजे अब्दुल कलाम व महर्षी व्यास व्यापारी संकुल गेल्या काही महिन्यांपासून रिकामे ओस पडलेले आहेत. या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलाव मार्चपूर्वी करण्यात येऊन पालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अतुल पाटील यांनी केली. पाणीपुरवठा योजनेत एक कोटी ४५ लाख३१ लाख९७६ रुपये उत्पन्न, तर एक कोटी ८० लाख९२ हजार८११ रुपये खर्च अपेक्षित असून ३५ लाख६० हजार८३५ रुपये तूट आहे. सदरची तूट भरून काढण्यासाठी नविन वसाहतीमध्ये होणाऱ्या नविन नळ संयोजन जोडणीतून भरून काढता येईल, व उर्वरीत तूट १५ व्या वित्त आयोगातून भरून निघेल असे नगरसेवक अतुल पाटील म्हणाले.
या सभेला महर्षी व्यास आघाडी प्रमुख राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी, कल्पना वाणी, पौर्णिमा फालक, देवयानी महाजन यांच्यासह सत्तारूढ नगरसेवक उपस्थित होते. लेखापाल नितीन सुतार, बांधकाम विभागाचे कानिष्ठ अभियंता एस.इ. शेख, योगेश मदने यांनी सभेच्या कामकाजात सहकार्य केले.
शहरासह, शहरालगतच्या नविन वसाहतीमधील नागरिकांना स्थावर मालमत्ता स्वतःचे नावावर ( लावून घेण्यासाठी) वर्ग करून घेण्यासाठी येथील पालिकेने येत्या ३१ मार्चपर्यंत मालमत्तेच्या किमतीवर केवळ एक टक्का फी घेण्यात येणार आहे.एरव्ही ही फी तीन टक्केप्रमाणे आकारण्यात येते. नगरसेवक अतुल पाटील यांनी याबाबत सभागृहात सूचना मांडली. त्यास माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते, मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी, रेखा चौधरी यांनी दुजोरा देत उपस्थित सर्व नगरसेवकांनी बाके वाजवित निर्णयाचे स्वागत केले. संबंधित नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी एक टक्का फी मध्ये स्वतःच्या नावावर स्थावर मालमत्ता वर्ग करून घ्यावी असे आवाहन नगरसेवक अतुल पाटील यांनी केले आहे.