Home Cities यावल यावल कृउबा समितीमध्ये ५ हजार स्क्वे. फुटाचे लिलाव ओट्यांना मंजुरी

यावल कृउबा समितीमध्ये ५ हजार स्क्वे. फुटाचे लिलाव ओट्यांना मंजुरी

0
223

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी विकासकामे लवकरच सुरू होणार आहेत. आमदार अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे या कामांना शासनाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ५ हजार स्क्वेअर फुटाचे आधुनिक लिलाव ओटे, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याच्या टाक्या यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा समावेश आहे.

बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील मुख्य बाजार यार्ड परिसरात अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित होती. शेतकरी बांधवांनी वेळोवेळी या कामांसाठी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनात बाजार समितीच्या संचालक मंडळाने या विकासकामांसाठी ठराव पारित करून प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. आता या सर्व प्रस्तावांना शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.

या प्रस्तावित विकासकामांमध्ये मुख्य बाजार यार्डातील तोल काटा साईडचे सपाटीकरण करणे, गटारीद्वारे सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करणे, पिण्याचे व वापराचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याच्या टाक्या उभारणे, तसेच ५ हजार स्क्वेअर फुट क्षेत्रफळाचे आधुनिक लिलाव ओटे तयार करणे यांचा समावेश आहे. याशिवाय उपबाजार किनगाव येथे देखील पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यासाठी टाक्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या सर्व कामांची अंमलबजावणी बाजार समितीच्या स्वनिधीतून केली जाणार आहे, अशी माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली.

या कामांमुळे बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांसाठी सुविधा व सुरक्षितता वाढणार असून, व्यापार प्रक्रियेतील अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती हे आधुनिक व शाश्वत सुविधांनी युक्त केंद्र म्हणून उभे राहणार आहे.


Protected Content

Play sound