यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सातपुडा पर्वतरांगांतील जंगल भागात वणवा लावणाऱ्या व्यक्तीविरुद्ध यावल वनविभागाने मोठी कारवाई करत आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. वाघझिरा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४९ मध्ये लावण्यात आलेल्या वणव्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला होता. मात्र, वन विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सातपुडा परिसरातील वाघझिरा राऊंड अंतर्गत परिमंडळ वाघझिरा, नियतक्षेत्र मनुदेवी कक्ष क्रमांक १४९ येथे तपासणी केली. या वेळी विविध ठिकाणी वन-वणवा लावलेला आढळून आला. पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपी राज्या सखाराम बारेला हा प्रत्यक्ष वणवा लावताना दिसून आला.

वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपी हा झेंडी, तालुका यावल, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वनरक्षकांनी भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने राखीव जंगलात लागलेला वणवा तत्काळ विझवण्याचे काम हाती घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला यावल येथे आणण्यात आले. पुढील दिवशी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ मार्च २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
ही संपूर्ण कारवाई यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक सौरिष सहाय, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवणे, अशोक राठोड, रतन शेलार, जगदीश बारेला आणि इतर वनसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणावर जंगलाचे नुकसान टळले.
सातपुडा परिसरात वाढत्या तापमानामुळे वणव्याचा धोका आधीच वाढलेला असताना अशा घटना अधिक गंभीर ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा प्रकारांची तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे.



