Home क्राईम यावल पूर्व वनविभागाची मध्यरात्री धडक कारवाई ; वाहनासह ४.६० लाखांचा अवैध लाकूड...

यावल पूर्व वनविभागाची मध्यरात्री धडक कारवाई ; वाहनासह ४.६० लाखांचा अवैध लाकूड साठा जप्त


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात अवैध वृक्षतोड व लाकूड तस्करीविरोधात वनविभागाने आक्रमक भूमिका घेतली असून, यावल पूर्व वनविभागाच्या पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वृक्षतोड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

रात्री सुमारे २२:२५ वाजेच्या सुमारास यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहमांडली राऊंड पथक यावल–फैजपूर रस्त्यावर गस्त घालत होते. यावेळी संशयित ट्रक क्रमांक एमएच-१९ झेड २४९९ ची तपासणी केली असता, वाहनामध्ये निंब, बाभूळ व चिचोल प्रजातीचे जळाऊ लाकूड मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

वाहन चालक शेख मोहिनुद्दीन शेख उद्बोदिन, रा. रावेर ता. रावेर जि. जळगाव याच्याकडे लाकूड वाहतुकीचा अधिकृत परवाना किंवा पास मागितला असता कोणतेही वैध कागदपत्र सादर करण्यात आले नाही. त्यामुळे भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२)(ब), ४२, ५२ तसेच महाराष्ट्र वननियमावली २०१४ चे नियम ३१ व ८२ अन्वये सदर कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सुमारे १२ घनमीटर जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे १०,२४८ रुपये आहे. तसेच वापरात असलेल्या वाहनाची अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रुपये असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ४ लाख ६० हजार २४८ रुपये इतकी आहे. हा सर्व मुद्देमाल मुख्य विक्री केंद्र, यावल येथे पावतीने जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणी आगार रक्षक बी. बी. गायकवाड, यावल यांनी गुन्हा क्रमांक ०४/२०२५ दिनांक २५ डिसेंबर रोजी नोंदविला आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, सहाय्यक वनसंरक्षक जमीर शेख तसेच (प्रादेशिक व कॅम्पा) यावलचे समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईदरम्यान मोहमांडली राऊंड पथक, आगार रक्षक यावल आणि वाहन चालक उपस्थित होते.

संक्षेप: यावल पूर्व वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री कारवाई करत वाहनासह सुमारे ४.६० लाख रुपयांचा अवैध जळाऊ लाकूड साठा जप्त करून वृक्षतोड माफियांना जोरदार धक्का दिला आहे.


Protected Content

Play sound