यशश्री शिंदे हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबई येथील २० वर्षीय यशश्री शिंदे खून प्रकरणी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातून अटक करण्यात आली आहे. त्याला गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. यशश्री ही २५ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती आणि त्यानंतर शनिवारी तिचा मृतदेह नवी मुंबईतील उरण येथील रेल्वे स्थानकाजवळील झुडपात सापडला होता. उरणमध्ये यशश्री शिंदे हिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला होता. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने तिचा खून केला.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्रीच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आणि चाकूने वार केल्याच्या जखमा आढळल्या होत्या. यातून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असल्याचे दिसून आले होते. यशश्री शिंदे २५ जुलैपासून बेपत्ता होती. त्यानंतर तिचा मृतदेह उरणमधील कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळला होता. तिचा चेहरा, शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. तिच्या गुप्तांगावर चाकूने वार करण्यात आले होते.

यशश्रीचा खून करणा-या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. मात्र आरोपी सतत लोकेशन बदलत होता. पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. यापूर्वी या प्रकरणी कर्नाटकातील मोहसीन नावाच्या एका व्यक्तीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो यशश्रीच्या सतत संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना फोन कॉल डिटेल्सवरून मिळाली होती. मोहसीनला आज अधिक चौकशीसाठी उरण येथे आणले जाण्याची शक्यता आहे.

Protected Content