यावल, प्रतिनिधी | येथील संपुर्ण राज्यात प्रसिध्द असलेल्या ‘जशने पैरहन ए शरीफ’ या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने कुस्त्यांची दंगल मोठया उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या नामवंत मल्लालांच्या कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
येथे आज (दि.१५) शहरातील बाबानगर वसाहतीतील मैदानावर दुपारी ४.०० वाजता ‘जशने पैरहन ए शरीफ’ च्या धार्मिक ढोली मिरवणुकीच्या निमित्ताने दोन दिवस विविध ठीकाणी लंगरचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात येते. तसेच त्या निमिताने सालाबादप्रमाणे उत्सवाचा समारोप कुस्त्यांच्या कार्यक्रमाने झाला. शहरातील बाबानगर वसाहतीमधील भव्य प्रांगणावर या खुल्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या दंगलीत हरीयाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातुन सुमारे १०० नामवंत मल्लांनी सहभाग घेतला.
बाबुजीपुरा पैरहन शरीफ कमेटीच्या वतीने आयोजित या कुस्त्यांच्या दंगलीचे उद्घाटन भुसावळ येथील युवा सामाजीक कार्यकर्ते धीरज अनिल चौधरी, यावलचे पोलीस उपनिरीक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शकील खान जमशेरखान, नगरसेवक आभिमन्यु विश्वनाथ चौधरी आदी मान्यवर उपास्थित होते. पंच म्हणुन येथील मुश्ताक पहेलवान आणि रशीद पहेलवान यांनी काम पाहीले. या कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.