फैजपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवरात्र उत्सवात कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. दुर्गा, सरस्वती व लक्ष्मीचे रूप असलेल्या कन्यांचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असल्याने येथील सतपंथ चारिटेबल ट्रस्टतर्फे तुलसी हेल्थ केअर सेंटर, श्री निष्कलंक धाम वढोदा, फैजपूर येथील निसर्गरम्य अशा ठिकाणी परिसरातील तब्बल ५०१ कन्यांचे विधिवत पूजन करण्यात आले.

महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी उपस्थित कन्यांचे पाय धुवून, पुसून स्वच्छ करून प्रत्येकीचे विधिवत औक्षण केले. नंतर त्यांना सन्मानाने पाटावर बसवून पोटभर भोजन दिले. या सर्व कन्यांना वॉटर बॅग, शृंगार साहित्य, शालेय साहित्य, ३१ रुपये भेट म्हणून देण्यात आले. यावेळी उपस्थित कन्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. या शिस्तबद्ध कार्यक्रमाप्रसंगी महाराजांसह उपस्थितांनी सर्व समाजातील दुर्गेच्या रूपात असलेल्या कन्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी कन्यांच्या आई-वडिलांसह सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.




