Home राज्य चिंतेची बातमी ! ‘अल निनो’मुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता

चिंतेची बातमी ! ‘अल निनो’मुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असून अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. दरम्यान जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या मान्सून हंगामाबाबतही विविध अंदाज समोर येऊ लागले आहेत. जागतिक हवामान संघटनेने यंदाच्या मान्सूनबाबतचा प्राथमिक अंदाज जाहीर केला असून भारतात यावर्षी ‘अल निनो’चा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा देशात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागील वर्षी मान्सून देशात वेळेआधी दाखल झाला होता. त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या मान्सूनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जर ‘अल निनो’चा प्रभाव वाढला तर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे २०२६ या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या काळात देशातील बहुतांश भागांत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उन्हाळी हंगामात देशातील बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मात्र दक्षिण भारतातील काही भाग तसेच काही इतर प्रदेशांमध्ये किमान तापमान सामान्य ते किंचित कमी राहू शकते. मार्च २०२६ महिन्यात देशातील अनेक भागांत कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता असली तरी ईशान्य भारत, पूर्व भारतातील काही भाग, पश्चिम हिमालयीन प्रदेश तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत किमान तापमान सामान्य ते कमी राहू शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

एकूणच, यंदा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता असताना मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव राहिल्यास पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष आता येणाऱ्या मान्सूनच्या पुढील अंदाजांकडे लागले आहे.


Protected Content

Play sound