पुणे प्रतिनिधी । येथील कोथरुड विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी प्रतिनिधींसोबत आज झालेल्या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली होती. यामुळे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची चिंता दूर झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले चंद्रकांत पाटील यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजीत देशपांडे यांनी अखेर आज माघार घेतली आहे. तर ब्राह्मण महासंघाने पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. भाजपकडून गेली पाच वर्षे मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. मात्र, यावेळी कुणाच्या ध्यानीमनी नसताना येथे चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच नाराजी उफाळून आली. मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असले तरी येथील ब्राह्मण संघटनांनी बंडाचा आवाज बुलंद केला होता. यावेळी ‘दूरचा नको, घरचा उमेदवार हवा’ अशी पोस्टरबाजी करून पाटील यांना विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोथरूडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी ब्राह्मण व्यक्तीला मिळावी, हाच यामागचा उद्देश होता. यातूनच परशुराम सेवा संघाचे सत्यजीत देशपांडे व ब्राह्मण महासंघाचे मयुरेश अरगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.