चाळीसगाव (प्रतिनिधी) उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. यात मानवाच्या राहणीमानाच्या बदलत्या संकल्पनेमुळे पक्षांची देखील संख्या कमी होऊ लागली आहे. पक्षांच्या जीवाची तगमग पाहता शहरातील युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. यात ‘पक्षांपर्यंत पाणी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून चिमण्यांना पाण्यासाठी नागरिकांना परळ देण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर आज येथे दोघा संस्थांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव, हिरकणी महिला मंडळाच्या संस्थापिका सुचित्रा पाटील, लता जाधव, वैष्णवी पाटील आदी उपस्थित होत्या. चिमणीसारखे अनेक पक्षी आज अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत, अभयारण्यात पाण्याची मात्रा खालावल्याने अनेक पक्षी मानवी वस्त्यांकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यात शहरात बांधकामे वाढल्यामुळे पक्षांना निवारा राहिलेला नसून सावलीसाठी व पाण्यासाठी पर्यायी जागा शोधण्याची वणवण त्यांना करावी लागते. हे लक्षात घेत जागतिक चिमणी दिवसाच्या औचित्याने मागील वर्षी शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयात घरटी वितरीत करण्यात आली होती. या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला होता. यात अनेकांनी आपापल्या परिसरात पक्षांच्या निवाऱ्याची व्यवस्थाही केली होती.
रणरणत्या उन्हात पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.पाणी न मिळाल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. यासाठी युगंधरा फाउंडेशन व हिरकणी महिला मंडळाच्या वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘पक्षांपर्यंत पाणी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणाऱ असल्याचे स्मिता बच्छाव यांनी यावेळी म्हटले. याबाबत विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येणार असून चिमण्यांचा नैसर्गिक अधिवास असलेली काटेरी झुडपे, ओढे, वेली यासोबतच शाळा परिसरात असलेल्या झाडांवर परळ ठेवण्यात येणार असल्याचे सुचित्रा पाटील यांनी यावेळी सांगितले.