जळगाव, प्रतिनिधी | नवीपेठेतील प्राचीन वासुपूज्य जिनालयात भक्तीभावात संगीतमय विश्वशांतीयज्ञार्थ महाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
विश्वशांतीयज्ञार्थ महाभिषेक सोहळ्यात प्रथम लोडाया परिवारातर्फे श्रींचे स्तोत्र पूजन, मुथा परिवाराचे श्री नवग्रह पूजन, वेदमूथा परीवारातर्फे दशदिक्पापूजन, तर अनेकांनी अष्टमंगलपूजन केले. वासुपूज्य स्वामींचा अखंड धारा अभिषेक मोमाया परिवार , मनोवांच्छित पार्श्वनाथ प्रभूंचा महाभिषेक रजनीकांत कोठारी परिवार, महिनाथ भगवंताचा महाभिषेक छेडा परिवाराने केला. कृष्णा, कावेरी, गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी अशा नद्यांचे जल, ५१ हुन अधिक विहिरींचे पाणी महाभिषेकात वापरले गेले. पद्मालय तिर्थहून आणलेल्या जलकमलाने पूजा करण्यात आली. तपस्वी मोक्षरक्षित विजयजी महाराज यांची उपस्थिती होती. चौवटीया परिवारातर्फे गुलाब, निशिगंधा पुष्पपूजा समर्पण झाली. मुनींश्री प्रभुरक्षित विजयजी महाराजांनी मंत्रोच्चार पूर्वक श्री बृहद शांतीधारा महापुजन घोषनाद पद्धतीने केले. समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यरात्री १२ वाजता जळगाववासीयांच्या सुख समृद्धी शांतीसाठी मंगलभावना व्यक्त करत महाभिषेक वर्षाव झाला.