चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागातर्फे आज जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यार्थ्यांना ओझोन वायुच्या अस्तित्वाची माहिती व्हावी, वातावरणातील ओझोन थराचे महत्त्व कळावे, यासाठी प्रा.डॉ.शैलेश वाघ यांचे जाणीव जागृतीपर व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी व्याख्यानातून ओझोन वायूचे वातावरणातील अस्तित्व, निर्मिती, महत्त्व व ओझोनचे फायदे सांगितले. जोपर्यंत वातावरणात ओझोनचे अस्तित्व आहे. तोपर्यंतच पृथ्वीवर जीवसृष्टीचे अस्तित्व टिकून राहील. ज्यावेळी मानवाच्या विविध विघातक क्रियांमुळे ओझोनचे अस्तित्वाची समस्या निर्माण होईल तेव्हा जीवसृष्टीचे अस्तित्व देखील धोक्यात येईल, किंबहुना धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. म्हणून प्रत्येकाने इतरांना सल्ले न देता स्वतःच्या लहान-लहान क्रियांद्वारे वायुप्रदूषणाच्या माध्यमातून ओझोनला क्षती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वाघ यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यामुळे ओझोन वायुचे संवर्धन ही पूर्णपणे मानवी नियंत्रणाची बाब असून भावी पिढीला त्यांनी आपल्या सादरीकरणाद्वारे साद घातली. यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. कार्यक्रमप्रसंगी विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, डॉ. शैलेश वाघ, प्रा. मुकेश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. याचबरोबर प्रा.संगिता पाटील, प्रा.मोतिराम पावरा, प्रा.मनिष पावरा सभागृहात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर निकम व भूगोलशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.