गोदावरीतून ४ हजार नर्सेस आरोग्य सेवेत – डॉ.उल्हास पाटील

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आरोग्य सेवेसाठी मागील दोन दशकात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातून तब्बल ४ हजार नर्सेस पूर्ण प्रशिक्षण घेऊन समाजात रुग्णसेवा करीत असल्याचे गौरवोद्गार ‘गोदावरी फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी काढले. निमित्‍त होते ‘फ्लोरेन्स नाईटअँगल’ यांच्या जन्मदिनाचे. याप्रसंगी ते बोलत होते.

‘गोदावरी फाऊंडेशन’ संचलित ‘गोदावरी नर्सिंग महाविद्यालय’ परिसरातील तेवन येथे गुरुवार, १२ मे रोजी ‘जागतिक परिचारीका दिना’निमित्‍त लॅम्पलायटिंग व शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड,  गोदावरी नर्सिंगच्या प्राचार्य मौसमी लेंढे, उपप्राचार्या मेनका एस पी, संचालक शिवानंद बिरादर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे उपस्थित होते.

सायंकाळच्या आल्हादायक वातावरणात शुभं करोतीच्या मंजूळ शब्दांमध्ये मंत्रमुग्ध होत मान्यवरांच्या हस्ते फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्याहस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी फ्लारेन्स नाईटअँगल यांची वेशभुषा साकारलेल्या विद्यार्थीनीच्याहस्ते केक कापून जयंतीदिन साजरा करण्यात आला.

गोदावर नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे यांनी प्रास्ताविकात गोदावरी फाऊंडेशनची सुरुवात, आज सुरु असलेल्या विविध शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा आदिंबाबत सविस्तर माहिती दिली; तसेच सन २०२२ साठी असलेली नर्सिंगची संकल्पना सांगत, कोरोना महामारीत नर्सेसने दिलेल्या सेवेबद्दलही अभिमान व्यक्‍त करत परिचारीका दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

 

यानंतर डॉ.केतकी पाटील यांनी मनोगतात, नर्सेस म्हणून कार्यरत असलेल्या गोदावरीच्या एंजेल्सचे कौतुक करत रुग्णसेवा करतांना रुग्णांच्या काळजीसोबत स्वत:चीही काळजी घ्या. असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया जाधव हिने केले.’

फ्लोरेन्स नाईटअँगल यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचे

नाटिका, कवितांद्वारे सादरीकरण –

नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाईटअँगल यांच्या जन्मापासून ते नर्सिंग क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याबद्दलची महती नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे सादर केली. यावेळी युद्धजन्य परिस्थीतीत त्यांनी सैनिकांचे कशी सुश्रुषा केली, ते दृश्य पाहतांना अनेकांच्या अंगावर शहारे आले. तर काही विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून नर्सिंगचे महत्व पटविले. यानंतर उपस्थितांनी हातात मेणबत्या प्रज्वलित करुन ‘नर्सिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करुन रुग्णसेवा करु.’ अशी शपथ घेतली.

Protected Content