भडगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई विद्यामंदिर व दादासाहेब सुपडू मालजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन व जागतिक मौखिक आरोग्य सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालय भडगाव यांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील या होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे दंतशल्यचिकित्सक डॉ. गेडाम, आरोग्य समुपदेशक श्री. मोरे, श्री. कोठावदे, उपमुख्याध्यापिका सीमा सैदाणे, पर्यवेक्षक एस. बी. भोसले आणि ज्येष्ठ शिक्षक अविनाश भदाणे उपस्थित होते. सुरुवातीला ज्ञानदेवता सरस्वती व संस्थेचे आराध्य दैवत कर्मवीर तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. गेडाम यांनी जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास सांगताना ७ एप्रिल १९४८ रोजी झालेली ‘जागतिक आरोग्य संघटनेची’ (WHO) स्थापना आणि आरोग्याविषयीच्या जागरूकतेचे महत्त्व विशद केले. ‘Happy Mouth is a Happy Life’ या संकल्पनेवर आधारित त्यांनी विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्याची सविस्तर माहिती दिली. तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. आरोग्य सेवक श्री. कोठावदे यांनी मानवी शरीरातील ५० टक्के आजार हे पोटाच्या विकारांमुळे होतात, हे सांगून पोटाचे आरोग्य जपण्याचे आवाहन केले. आरोग्य समुपदेशक श्री. मोरे यांनी ‘योग्य आहार आणि नियमित व्यायाम’ हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्रास्ताविक सुधीर चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन व्ही. एस. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशालेय समिती, कला शिक्षक श्री. वाय. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



