मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, ३ जून रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव श्री.भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव श्री.कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे मार्गदर्शन करतील.
विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग अधिवेशन कामकाजाचे वार्तांकनासाठी करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.