नवी दिल्ली वृत्तसंस्था । आजच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या असून यात पेन्शन आणि बोनसचा समावेश आहे.
पियुष गोयल यांनी आजच्या अर्थसंकल्पात कामगारांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. यात ग्रॅच्युईटीची मर्यादा ही १० लाखांवरून २० लाखांवर करण्यात आलेली आहे. आता २१ हजार वेतनापर्यंतच्या सर्व कामगारांना बोनस मिळणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. या कामगारांना वार्षिक ७ हजार रूपयांचा बोनस मिळणार आहे. तर असंघटीत क्षेत्रातील कामगारांना आता किमान ३ हजार रूपये इतके निवृत्तीवेतनदेखील (पेन्शन) मिळणार असल्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली. वयाची साठी ओलांडलेल्या कामगारांना हे पेन्शन मिळेल. तर कामगाराचा मृत्यू झाल्यास सहा लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. देशभरातील सुमारे १० कोटी कामगारांना याचा लाभ होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.