नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई ते बेंगळुरू या १४ पदरी महामार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या महामार्गामुळे वाहने पुणे शहरात न येता शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याचा दावाही त्यांनी केला.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते. राज्यात सार्वजनिक बांधकाममंत्री असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पुढील पन्नास वर्षांचा विचार करून बांधण्यात आला होता. मात्र आता हा महामार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे अटल सेतूपासून बेंगळुरूपर्यंत नवा महामार्ग करण्यात येणार आहे. या महामार्गाची निविदा काढण्यात आली आहे.
१४ पदरी असलेल्या या महामार्गाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाणार आहे. हा महामार्ग पुण्याच्या वर्तुळाकार मार्गिकेला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहने शहरात न येता बाहेरूनच जाणार असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. तसेच हाच मार्ग छत्रपती संभाजीनगर रस्त्यालाही जोडला जाणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.