सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेले नाही. कामी बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चालले आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते.
भाजपचे नेते नारायण राणे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, 28 नोव्हेंबरला शपथविधी झाला. आज 8 डिसेंबर आहे. तरीही अजून यांचे खातेवाटप होऊ शकलेले नाही. खातेवाटपच काय पण अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवले आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली आहेत, ठप्प आहेत. हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नाही. कामं बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चालले आहे. हे सरकार दीर्घ काळ चालणार नाही. हे काही महिन्याचे पाहुणे सरकार असल्याचेही राणे यांनी म्हटले.