
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे पिंप्री अकराऊत गावात खुलेआम दारु विक्री सुरु आहे. गावात दारू बंद व्हावी,यासाठी संतप्त महिलांनी तहसिलदार शाम वाडकर व पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांना नुकतेच निवेदन दिले आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील काही जण हे सर्रासपणे गावठी व देशी दारु गावात विकत आहेत. त्यामुळे गावातील लोकांना दारुचे व्यसन लागत असून बहुतांश तरुण दारुच्या आहारी गेले आहेत. गावातील काही तरुण हे दारुमुळे मयत झाल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे. दारुमुळे गावातील सामाजीक स्वास्थ बिघडत आहे. त्यामुळे भविष्यात गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित दारु विक्रेत्यांवर अंकुश निर्माण करुन गावातून दारु कायम स्वरुपी हद्दपार करण्याबाबत देखील निवेदनात म्हटले आहे. तहसिलदारांना निवेदन देतांना सरला पिवटे, रजनी खोसे, रुपाली माळी, जिजाबाई पाटील, निर्मला लोंढे तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.