Home राजकीय निवडणूक प्रचारात महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली तर थेट कारवाई! — महिला आयोग...

निवडणूक प्रचारात महिलांबद्दल अभद्र टिप्पणी केली तर थेट कारवाई! — महिला आयोग सज्ज 

0
145

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांमध्ये महिला उमेदवारांविषयी अभद्र आणि आक्षेपार्ह विधानांच्या घटनांना आळा बसावा यासाठी राज्य महिला आयोगाने कंबर कसली आहे. प्रचाराच्या गरम वातावरणात अनेकदा मर्यादा ओलांडणाऱ्या वक्तव्यांना आत्ता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. महिला आयोगाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून सखोल सहकार्याची विनंती केली असून, सर्वसामान्य महिलांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सामान्यतः प्रचारादरम्यान नेतेमंडळी भाषणाच्या ओघात अतिरेकी वक्‍त्यव्या करतात. यातून महिला उमेदवारांविषयी वैयक्तिक, जातीय किंवा धार्मिक टीका केल्याचे प्रकार घडत आले आहेत. त्यामुळे महिला आयोगाने पुढील निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने — पुरुष असो वा महिला — इतर महिला उमेदवारांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्यास त्यावर तात्काळ कारवाईचा इशारा दिला आहे. आयोगाने स्पष्ट केलं आहे की, या प्रकारची माहिती मिळताच आयोग स्वतः दखल घेईल आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जाईल.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अप्सरा रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महिला उमेदवारांविषयी टीका करताना वैयक्तिक जीवन, शिक्षण, कुटुंब, जात, धर्म यावरून टिप्पणी होणे पूर्णतः निषिद्ध आहे. प्रचार स्वच्छ, संवेदनशील आणि सन्मानजनक व्हावा, यासाठी प्रत्येक पक्षाने जबाबदारीने वागावं.”

महिला आयोगाने या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगालाही पत्र पाठवले असून, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती देण्याचा आग्रह केला आहे. आयोगाने ही मोहीम ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून अधिकृतपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, आयोगाच्या टीमकडून कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. यामाध्यमातून विद्यार्थिनींकडून प्रचारातल्या आक्षेपार्ह वागणुकीविषयी माहिती घेतली जाणार आहे.

याशिवाय, सर्वसामान्य महिलांना आयोगाने आवाहन केले आहे की, जर प्रचारादरम्यान कोणत्याही महिला उमेदवारांविषयी अश्लील, अपमानजनक किंवा वैयक्तिक टिप्पणी केली गेली, तर त्यांनी त्वरित महिला आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन संबंधित सदस्यांचे मोबाईल नंबर वापरून संपर्क साधावा.

या उपक्रमामुळे महिला उमेदवारांसाठी सुरक्षित, सन्मानित आणि निर्भय प्रचाराचे वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे. राजकारणातील महिलांना केवळ सौंदर्याच्या, कुटुंबाच्या वा जातीच्या चौकटीत न पाहता त्यांच्या कार्यावर, विचारांवर चर्चा व्हावी, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.


Protected Content

Play sound