फैजपूर प्रतिनिधी । महिलांचे कार्यक्षेत्र फक्त चूल आणि मुल यापुरताच मर्यादित न राहता, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहुन बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करावा, महिलांनी या माध्यमातून छोटे-मोठे व्यवसाय अथवा उद्योग उभारल्यास समाजापुढे वेगळे नेतृत्व विकसित होईल, असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी महिलांना मार्गदर्शन व्दारे केले.
आज शुक्रवारी फैजपूर नगरपरिषद सभागृहात नगरपरिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ जळगाव अंतर्गत मनोकामना लोकसंचलित साधन केंद्र यावल यांच्या अंतर्गत दीनदयाळ अंतर्गत योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत स्थापन झालेल्या महिला वस्ती स्तर संघाना कार्यात्मक साक्षरता प्रशिक्षण अयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक माधव गवई, माविम जिल्हा समन्वयक अधिकारी आतिक शेख, माविम तालुका व्यवस्थापक रविंद्र पाटील यांच्या सह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.