महिलांचा रक्षाबंधनानिमित्त सत्कार

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथिल आधार फाउंडेशनच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्यातर्फे मुडी- मांडळ जिल्हा परिषद गटातील बचत गटांच्या साठी विशेष परिश्रम घेणाऱ्या ११०० कार्यकर्त्या महिलांना रक्षाबंधनानिमित्त पैठणी साडी देऊन संभारंभपूर्वक गौरविण्यात आले. स्व देना पाटील माध्यमिक विद्यालय चोबारी येथे संपन्न झालेल्या रक्षाबंधन व स्नेह मेळाव्याच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील या होत्या.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी झटणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव तसेच कार्यकर्त्या भगिनींच्या परिश्रमाची भाऊ या नात्याने दखल घेऊन माझ्या बहिणींना पैठणी समारंभपूर्वक देऊन गौरविणे माझे नैतिक कर्तव्य समजतो.असे याप्रसंगी बोलतांना कार्यक्रमाचे संयोजक कृ.उ.बा.सभापती अशोक आधार पाटील यांनी सांगितले. लाडक्या बहिणींचा विचार सरकार करत असले तरी भाऊ या नात्याने आधार संस्थेच्या माध्यमातून अशोक पाटील हे राबवत असलेला उपक्रम महिलांचा गौरव आणि सन्मान वाढवणारा आहे बदलत्या काळात महिलांनी आपली व मुलींच्या सुरक्षतेबाबत जागरूक असणे गरजेचे आहे असे याप्रसंगी आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात सौ. जयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना, ‘आधार संस्था व श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मुडी-मांडळ जि प गटात सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी दिली. शेतकरी नेते डॉ.रामराव पाटील यांनी मुडी मांडळ जि प गटातील नागरिक हे समाजउपयोगी कामाची दखल घेऊन सभापती अशोक पाटील यांना भविष्यातही साथ देतील असे सांगितले. अमळनेर तालुका बचत गटाच्या तालुका व्यवस्थापक श्रीमती सीमा रगडे यांनी बचत गटासाठी राबणाऱ्या महिलांची कुणीतरी दखल घेत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला.

यावेळी मंचावर बचत गटाच्या सी.आर.पी भगिनींनी अशोक पाटील यांचे ऑक्षण करून राखी बांधली. तर अशोक पाटील,सौ योगिता पाटील यांच्यावतीने जि. प.सदस्या सौ.जयश्री पाटील यांचेहस्ते सर्व उपस्थित भगिनींना यावेळी पैठणी साडी भेट देण्यात आली तसेच मिष्टांन्नासह स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंदाकिनी भामरे , आशाबाई चावरिया, सामाजिक कार्यकर्ते जोत्सना लोहार, अलका पाटील,भारती पाटील, यांनीही अशोक पाटील यांचे ओक्षण करून राखी बांधली. यावेळी श्री.आधार पाटील, सौ विमलबाई पाटील यांचा सत्कार सौ जयश्री पाटील यांनी केला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर, सौ पुष्पा पाटील, भाईदास भिल, प्रकाश अमृतकर, ऋषभ पारेख, शरद पाटील,विजय जैन, माजी संचालक सदाबापू पाटील, गट सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, बचत गटाच्या समन्वयीका सौ ज्योती भावसार, सरपंच कैलास पाटील श्याम पाटील संजयराव पाटील, किसन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा पदाधिकारी राहुल गोत्राळ आदींसह मुडी मंडळ जि प गटातील विविध संस्थांचे पदाधिकारी राजकीय व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेते यांची उपस्थिती यावेळी होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
चौबारी हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, मुख्याध्यापक आशिष पवार, संस्थेचे कार्याध्यक्ष समाधान शेलार समाधान पाटील समाधान शिंदे ,योगेश पाटील, शिक्षक शिक्षिका वृंद यांनी परिश्रम घेतले. बचत गटातील हजारो महिला भगिनी आणि पंचक्रोशीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content