जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील तापी पुलाजवळील यशवंत नगर येथील महिलांनी घरकुल आणि रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी महिलांनी विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
रहदारी मार्ग बंद; रहिवाशांना मोठ्या अडचणी
यशवंत नगर येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रहदारी मार्गाच्या समस्येला सामोरे जात आहेत. मुख्य रस्त्यापासून यशवंत नगरकडे जाणारा मार्ग एम.एस.ई.बी. अधिकाऱ्यांनी भिंत उभारून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५० ते २०० कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे. या मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, कामगार आणि महिला नियमित करत असतात. त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
सात वर्षांपासून प्रलंबित घरकुल योजना
२०१७ पासून रहिवाशांना घरकुल योजनेअंतर्गत घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत ही योजना पूर्णत्वास गेलेली नाही. अनेक कुटुंबे झोपड्यांमध्ये किंवा असुरक्षित घरांमध्ये राहत आहेत. प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने दिली मात्र कार्यवाही शून्य आहे. त्यामुळे घरकुल मिळाले नाही आणि आता रहदारी मार्गही बंद केला जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
महिलांनी लढ्याचा घेतला पुढाकार
या आंदोलनात महिला आघाडीवर होत्या. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. मथुराबाई पवार, मीराबाई मोरे, कैलास सावंत, समाधान पवार, गंगाबाई बागुल, किरण जमदाडे, आकाश गायकवाड, सुरेंद्र बागुल यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.