जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना पाचोरा येथे राहणाऱ्या एका ५८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने हातचलाखीने चोरून नेल्याची घटना बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता शांताराम चौधरी (वय ५८, रा. पाचोरा) या बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जळगाव ते पाचोरा या बस क्र.(MH-१९-५१९१) मध्ये चढत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन, त्यांच्या गळ्यातील सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याचे मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच सुनिता चौधरी यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना मंगळसुत्रा संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ प्रदीप पाटील हे करीत आहे.




