पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वतःच्या मुलीला जीवे मारण्याची भीती दाखवून एका २३ वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना पाचोरा तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी बाळू काळू राठोड याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात मंगळवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला हिसकावून घेतले आणि ‘मी तुझे बरेवाईट करेन’ अशी धमकी दिली. या धाकाखाली त्याने महिलेला पाचोरा येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही आरोपीने महिलेला बदनामी करण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील एका हॉटेलवर नेऊन पुन्हा अत्याचार केला. पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे अधिक तपास करत आहेत.




