Home क्राईम बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी, २५ लाखांच्या मदतीची शिवसेनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा बळी, २५ लाखांच्या मदतीची शिवसेनेची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात इंदुबाई वसंत पाटील या वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ४ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेत, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि मयत इंदुबाई पाटील यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, तो आता नरभक्षक बनला आहे. माणसांवर हल्ला करत असल्याने शेतकरी आणि महिलांना शेतात काम करणेही कठीण झाले आहे,” असे प्रा. सोनवणे यांनी म्हटले आहे. त्यांनी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही जीवितहानी होणार नाही आणि शेतकरी भयमुक्त होऊन शेतीची कामे करू शकतील, अशी मागणी केली.

यावेळी निवेदन देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक आप्पा सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, भीमराव पांडव, हिरालाल सोनवणे, राजू भाऊ पाटील, विजय लोहार, सचिन चौधरी, भोकरचे सरपंच नंदलाल सोनवणे, प्रभाकर कोळी, किरण ठाकूर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound