
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीने पतीसोबत जात असतांना चिखलामुळे दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान सोमवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. याबाबत मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बादलबाई दिनेश बारेला (वय-२३) रा. बालवाडी ता. सेंधवा मध्यप्रदेश असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बादलबाई बारेला या महिला आपल्या पती व तीन मुलांसह मध्यप्रदेशातील बालवडी येथे वास्तव्याला होते. २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पती दिनेश बारेला यांच्यासाबत बादलबाई बारेला ह्या दुचाकीने चोपडा तालुक्यातील हिंगोणे येथे जात होते. त्यावेळी त्यांची दुचाकी चिखलामुळे घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. याप्रकरणी मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



