जळगाव प्रतिनिधी । ‘आत्महत्या करू का ?’ अशी मस्करी करून रेल्वे रूळांवर गेलेल्या महिलेस मालगाडीचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे कॉन्स्टेबल श्रीकृष्ण सपकाळे हे काल रात्री शिवकॉलनी परिसरातील आपल्या सासर्याकडे गेले होते. यानंतर ते आपली पत्नी पूनम आणि मुलगा व मुलगीसह फिरायला निघाले. या दोन्हींमध्ये अलीकडच्या काळात थोडे वाद झाले होते. यात पूनम सपकाळे यांनी ‘आत्महत्या करू का ?’ असे विचारून रेल्वे रूळ गाठले. येथून ती आपले पती व मुलांसोबत बोलू लागली. यातच समोरून आलेल्या मालगाडीने पूनम यांना धक्का दिला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. अगदी काही क्षणांमध्ये घडलेल्या प्रकाराने श्रीकृष्ण सपकाळे व त्यांच्या मुलांना जबर धक्का बसला. तिचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला असून आज शवविच्छेदन होऊन दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, पूनम सपकाळेने मस्करीतून आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे ? याबाबत पोलीस तपास सुरू आहे.