अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे एका ४५ वर्षीय महिलेला घरात घुसून अमानुष मारहाण केल्याची आणि तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. विनाकारण घराबाहेर शिवीगाळ करणाऱ्या तरुणाला ‘तू शिव्या का देतोय?’ असा जाब विचारल्याचा राग आल्याने हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील बोहरा गावातील एका भागात ४५ वर्षीय महिला वास्तव्याला आहेत. ही महिला २३ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास आपल्या घराच्या ओट्यावर शेजारील महिलेशी बोलत असतांना गावातील संशयित आरोपी पवन शिवाजी पाटील हा तरुण पीडितेच्या घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला. पीडित महिलेने त्याला शिवीगाळ करण्याचे कारण विचारल्याचा रागा आल्याने अंगावर धावून आला.

जीवाच्या भीतीने पीडित महिला घरात पळाली आणि तिने दरवाजा लावून घेतला. मात्र, संतापलेल्या आरोपीने दरवाजावर जोरात लाथ मारून तो तोडला आणि बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. आरोपीने पीडितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. इतकेच नव्हे तर तिचे तोंड दाबून तिला तोंडावर आणि गालावर जोरात चापट मारून मारहाण केली. “तू माझे काहीच करू शकत नाही, कुठेही जा” अशी धमकीही त्याने यावेळी दिली.
महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणारी महिला धावून आल्या. त्यांनी आरोपीच्या तावडीतून पीडितेची सुटका केली आणि त्याला घराबाहेर काढले. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पवन शिवाजी पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संजय पाटील हे करीत आहे.



