अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील शहापूर येथील गौरेश्वर महादेव मंदिरावर ३१ फुटांचा भव्य त्रिशूल दान करून कै. पिरन भोमा पाटील यांनी आपल्या मृत्यूनंतर आयुष्यभर कमावलेल्या पैशांचे अनोखे आणि प्रेरणादायी दान केले आहे. जिवंतपणी बोलून दाखवलेली इच्छा मृत्यूनंतर पूर्णत्वास नेण्याच्या या आगळ्यावेगळ्या दातृत्वाची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू आहे.

शहापूर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गौरेश्वर महादेव मंदिराच्या शिखरावर हा भव्य त्रिशूळ उभारण्यात आला. कै. पिरन बापू पाटील यांना मूलबाळ नसल्यामुळे, त्यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी ही अंतिम इच्छा गावातील मंडळींना स्पष्टपणे सांगितली होती.

कै. पिरन बापूंच्या बँक खात्यात असलेल्या एकूण तीन लाख रुपयांपैकी, दीड लाख रुपये त्यांच्या उत्तरकार्यासाठी वापरावेत आणि उर्वरित दीड लाख रुपये मंदिरासाठी ३१ फुटांचा त्रिशूळ दान करण्यासाठी खर्च करावेत, असा त्यांचा स्पष्ट मानस होता. कै. पिरन पाटील हे अध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. गावातील कीर्तन सप्ताहात आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच मोठा सहभाग आणि उत्साह असायचा. त्यांच्या या श्रद्धाभावातूनच त्यांनी ही अनोखी इच्छा ग्रामस्थांसमोर व्यक्त केली होती.
कै. पाटील यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी त्यांच्या शब्दाला मान दिला. त्यांनी वाजतगाजत अंत्ययात्रा काढली, विधिपूर्वक उत्तरकार्य पार पाडले आणि उरलेले पैसे मंदिरासाठी वापरून हा भव्य त्रिशूळ दान केला. गावातील योगेश पाटील व ग्रामस्थ मंडळांनी अथक प्रयत्न करून बापूंच्या इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय दिला.
या कृतीमुळे गावकऱ्यांनी कै. पाटील यांना योग्य श्रद्धांजली अर्पण केली आहे. ग्रामस्थांच्या मते, कै. पाटील यांनी केलेले हे कार्य संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. या त्रिशूळ दानामुळे केवळ मंदिराची शोभा वाढली नाही, तर समाजात श्रद्धा, सद्भावना आणि प्रेरणेचा अनमोल संदेश पोहोचला आहे.



