Home Cities अमळनेर लाईन दुरुस्ती करताना वायरमनला विजेचा जोरदार शॉक; प्रकृती चिंताजनक

लाईन दुरुस्ती करताना वायरमनला विजेचा जोरदार शॉक; प्रकृती चिंताजनक

0
189


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वासरे गावात लाईन दुरुस्तीचे काम करत असताना एका आऊटसोर्सिंग वायरमनला विजेचा जोरदार शॉक लागल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (१ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता घडली आहे. या घटनेत वायरमन गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

वायरमनला अचानक लागला विजेचा धक्का
वासरे गावात महावितरणचे बाह्यस्रोत कर्मचारी सत्यपाल चौधरी हे रोहित्रवर लाईन दुरुस्तीचे काम करत होते. काम सुरू असतानाच त्यांना अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने ते खाली कोसळले आणि गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी तात्काळ त्यांना अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले.

स्थानिकांच्या मदतीने बचाव
या दुर्घटनेनंतर जिजाबराव खंडू पाटील, नानाभाऊ वना भिल, विनोद अशोक पाटील, संजय धनराज पाटील, दीपक रमेश पाटील, सुरेश शांताराम पाटील, एकनाथ संतोष पाटील, संजय गुलाबराव पाटील, अंकुश शांताराम पाटील आणि दीपक पांडुरंग पाटील अशा अनेक स्थानिकांनी सत्यपाल चौधरी यांना मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे चौधरी यांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले. डॉक्टरांनी त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुरक्षेच्या साधनांवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे वीज विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीपीवर काम करत असताना वायरमनकडे आवश्यक आणि अद्ययावत सुरक्षा साधने नव्हती का, अशी चर्चा गावामध्ये सुरू आहे. या दुर्घटनेत सत्यपाल चौधरी यांच्या हाताला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कनिष्ठ अभियंता डी. जी. घरझारे यांनी घटनास्थळी भेट दिली.


Protected Content

Play sound