मुंबई वृत्तसंस्था । नागपूरला १६ ते २१ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतरच उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होणार असल्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. नागपूरचे अधिवेशन 6 दिवसांचे असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्यामुळे तसेच फारसे महत्त्वाचे कामकाज नसल्यामुळे चार दिवसांतही अधिवेशन गुंडाळले जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबर रोजी सुरू होणार असून, त्यापूर्वी उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतील, तसेच राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही भेट घेऊन आभार मानतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिली प्रस्तावित दिल्ली भेट ९ किंवा १२ डिसेंबरच्या मुहुर्तावरही होऊ शकते. ९ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा तर, १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे.
उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला घाई नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत. महत्त्वाच्या खात्यांविषयी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये चर्चा व्हायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गृह मंत्रालयाचा आग्रह धरला असला तरी शिवसेनेने त्यावर निर्णय घेतला नसल्याचे समजते. त्यामुळेच या तिन्ही पक्षांमधील चर्चांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्यास अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.