गडचिरोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सभ्य आणि वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे स्वागत करणाऱ्या महाराष्ट्रात राजकारणाचा स्तर घसरल्याची उदाहरणे दररोज पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विद्यमान राज्य सरकारमधील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या उदाहरणात आपल्या वक्तव्याने भर घातली आहे. हलगेकर कुटुंबाला नदीत फेकल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांचा विवाह हलगेकर कुटुंबात झाला आहे. हीच कन्या आगामी काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कथीतपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. तो धागा पकडून टीका करताना मंत्री महोदयांची जीभ घसरली आणि त्यांनी चक्क अप्रत्यक्ष धमकीच दिली.
उपस्थित जनसमुदयाला उद्देशून बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले की, जी मुलगी बापाची झाली नाही. ती तुमची कशी होणार? आज माझ्या बाजूला माझी दुसरी मुलगी आहे. एक मुलगा आहे. इतकेच नव्हे तर आजपर्यंत विरोधात असलेला माझा भाऊदेखील माझ्या सोबत आला आहे. त्यामुळे मला भीतीचे कारण नाही. माझ्याकडे दुधारी तलवार आहे. माझ्या वाट्याला गेलात तर पाहा. मी ती तलवार बाहेर काढणार आहे. आत्राम घराणे हे हलगेकर यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असे आत्राम यांनी म्हटले. हलगेकर कुटुंब म्हणजेच आत्राम यांची लेक आणि जावई, असा राजकीय अर्थ काढला जाऊ लागला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस दुफळी निर्माण झाली. अजित पवार हे जवळपास 40 आमदारांना सोबत घेऊन बाजूला झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करत सत्तेतही प्रवेश मिळवला. त्यामुळे शरद पवार एकाकी पडले. कन्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांसारख्या जुन्या साथीदारांना सोबत घेऊन न्याने पक्षबांधणी करत आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या मोर्चेबांधणीला यश येत असून, त्यांनी एक एक मोहरा गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षात अनेक दिग्गजांचे प्रवेश होऊ लागले आहेत. शिवाय, तरुणांना ते मोठ्या प्रमाणावर संधी देत आहेत. त्यामुळे नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्या मंडळींसाठी नवे क्षीतीज खुणवू लागले आहे. अशात धर्मराव बाबा आत्रम यांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये घेरण्याची तयारी सुरु आहे. असा वेळी त्यांची भाग्यश्री नावाची कन्याच शरद पवार यांच्या पक्षाकडून मैदानात उतरणार असल्याचे समजते. त्यांच्या कन्येच्या राजकीय भूमिकेवरुनच आत्राम यांनी टीका केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.