जळगाव, प्रतिनिधी | शहरातील रस्त्यातील खड्डे, साफसफाई, लाईट आदी समस्या पाहता आढावा बैठकीचे आयोजन आ. राजूमामा भोळे यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना कामचुकारपणा करू नये अशी सक्त ताकीद दिली.
निवडणूक, आचारसंहिता, पाऊस ही कारणे देऊन आतापर्यंत काम झालेले नाही यापुढे असे कोणतेही कारण ग्राह्य धरले जाणार नाही. यापुढे कामचुकार अधिकार व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम आ. राजूमामा भोळे यांनी बैठकीत दिला. याप्रसंगी महापौर सिमा भोळे, आयुक्त डॉ. उदय टेकाळे, उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बारी, उपयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे आदी उपस्थित होते.आ. राजूमामा भोळे यांनी अधिकाऱ्यांनी नगरसेवकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात अशा सूचना केल्या. प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास प्राधान्य द्या, यानंतर कॉलनी परिसरात रस्ते दुरुस्त करावेत अशी सूचना देखील आ. भोळे यांनी केली. अधिकाऱ्यांनी कोणालाही पाठीशी घालू नये कोणी काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला नोटीस द्या, ब्लॅक लिस्ट करा असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी भाजपा नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी कामे काही ठेकेदार कार्यादेश घेऊन देखील वर्ष वर्ष कामांना प्रारंभ करत नसल्याने त्या ठेकेदारावर कारवाई का करण्यात येत नाही असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी आयुक्त डॉ. टेकाळे यांनी सांगिलते की, ज्यांनी काम सुरु केले नाही त्याची माहिती घेऊन ते काम तेथेच थांबवून त्याचे आजच्या किंमतीवर नवीन टेंडर काढू असे सांगितले.